व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 4).
सॉफ्ट स्किल्स:
मागच्या एका लेखात मी सॉफ्ट स्किल्स चा उल्लेख केला होता. नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या गुणांची अवश्यकता असते. आपल्या शिक्षण किंवा कौशल्याबरोबरच आपल्याकडे सॉफ्ट स्किल्स असणे आवश्यक आहे. विशेषतः चांगल्या कम्पनीमध्ये नोकरी मिळण्यापूर्वी किंवा नोकरी मिळाल्या नंतर आपली प्रगती होण्यासाठी काही मूलभूत अंगचे गुण असावे लागतात आणि ते वेळोवेळी तपासले सुद्धा जात असतात. कम्पनिमधील मनुष्य संसाधन विभाग ( Human resources department) तसेच आपले वरिष्ठ या विषयात आपल्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. अर्थात हे गुण आपण अनुभवाने सुद्धा शिकू शकतो परंतु ते माहीत असणे आवश्यक आहे.
काय आहे हे सॉफ्ट स्किल्स ?
१) अनुकूलनिय किंवा जुळवून घेणे ( Adaptabilty): आपण कामाच्या ठिकाणी लवचिक ( flexible) आहोत का ? आपण नवीन गोष्टी शिकायला तयार आहोत का? कामाच्या ठिकाणी काही बदल झाला किंवा आपले कामाचे स्वरूप बदलले तर आपण ते सहज सकारात्मकरित्या स्वीकाराल का? ही लवचिकता व्यक्तीत बघितली जाते. काही वेळा आपली बसण्याची जागा, केबिन, टेलिफोन, फ्लॉवर पॉट, अगदी भिंतीवरील पोर्ट्रेट जरी बदलले तरी लोक आदळ आपट किंवा आकांड तांडव करतात, तर त्यांच्या कामाचे स्वरूप बदलले तर ही मंडळी काय करतील हे सांगता येत नाही. त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण येथे नोकर असून व्यवस्थापन किंवा वरिष्ठ काही विशिष्ट उदेशानुसार काही बदल घडवत असतात. त्यात काही वेळा असे बदल होतात की कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब आपली प्रतिक्रिया न देता त्या मागील कार्यकारण भाव काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. व्यवस्थापनाच्या निर्णयाचा आदर करत आपले कर्तव्य पार पाडणारे लोक कम्पनीला हवे असतात. हळूहळू का होईना आपण तो बदल स्वीकारायला हवा. काही बदल कदाचित चुकीचे किंवा कम्पनीला घातक सुद्धा असू शकतात पण आपण आपले पद बघून, तसेच आपल्या भावना किंवा विचार चार चौघात उघडपणे न मांडता, वेळ आणि काळ बघून वरिष्ठ मंडळींच्या कानावर घातल्या आणि आपले म्हणणे आग्रह न धरता, पटवू शकलात तर ते योग्य मानले जाईल व त्यावर सकारात्मक भूमिका सुद्धा घेतली जाऊ शकते.
2) सम्पर्क कौशल्य ( communication skill) ज्या भाषेत आपली संस्था काम किंवा व्यवहार करते त्या भाषेत आपण स्वतः लिखाणाद्वारे तसेच तोंडी आपले विचार सहज व्यक्त करू शकता का? आपण कितीही हुशार असलात तरी आपले विचार आपण थोडक्यात, योग्य शब्दात, मुद्देसूद पटवू शकला नाहीत तर त्या विद्वेतेचा सन्मान होत नाही.
आपले सादरीकरण कौशल्य ( presentation skills) उत्तम असावे. बोलण्याची शैली रटाळ, तेच तेच परत परत बोलणारी नसून त्यातून काही नवीन विचार व्यक्त करणारी आणि लोकांपर्यंत पोहोचेल अशी असावी.
आपण आपल्या सहकाऱ्यांबरोबर, वरिष्टांबरोबर, आपल्या पेक्षा कनिष्ठ मंडळीबरोबर, आपले ग्राहक, पुरवठादार, धनको आणि रूणको एवढेच काय ज्या ज्या मंडळींबरोबर आपला सम्बन्ध येतो त्यांचे बरोबर आपला व्यवहार आणि आचरण चांगले असावे. भाषा शैली आणि आवाजातील धार ( tone) यावर आपली अतिशय चांगली पकड असायला हवी आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावनेची असावी.
आपला चेहरा हा आपल्या मनाचे प्रतिबिंब आहे. त्यावरील हावभाव ( composition) तसेच आपल्या शरीराची हालचाल या मध्ये आणि आपण संबोधित करत असलेल्या आशयामध्ये तफावत असता कामा नये. लोक ते न्याहाळत असतात. ती नियंत्रित असावी.
एखाद्या प्रश्नावर चर्चा करत असताना किंवा नवीन व्यक्तीबरोबर मुलाखतीचे वेळी समोरच्या माणसांचे किंवा समूहाचे म्हणणे शांतपणे तो बोलत असताना त्यांच्या कथनाकडे नीट लक्ष देऊन ऐकावे आणि त्याला किंमत द्यावी या सारखे साधे उपाय फार उपयुक्त आहेत आणि ते प्रत्यक्षात आणल्यास त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.
असे म्हणतात एकदा काँग्रेसचे आसाम मधील एक महत्वाचे नेते हेमंत कुमार बिस्वा ज्यावेळी राहुल गांधींना भेटायला गेले तेव्हा राहुल गांधी त्याचे बोलणे ऐकत होते पण त्याचवेळी ते आपल्या कुत्र्याला खेळवत होते. बिस्वा ना ही गोष्ट आवडली नाही आणि ते तेथून उठले आणि सरळ भाजप च्या कार्यालयात जाऊन भाजप मध्ये शिरले आणि पुढे ते भाजप तर्फे आसाम चे 15 वे मुख्यमंत्री झाले. तात्पर्य, आपण कोणत्याही पदावर असा, संवादात दुसऱ्याला मान देणे हे सुद्धा सम्पर्क कौशल्याचा भाग आहे.
काही मंडळींना आपल्या कामाचा गाजावाजा करणे, दुसऱ्याच्या अंगावर कारण नसताना खेकसणे, बॉसिंग करणे, मुद्दामून कनिष्ठाना उचकवणे असे गुण तर या उलट काही कनिष्ठाना साहेबांची सर्वांसमोर हजामत करणे, त्याला उलट उत्तर देणे, आपल्या भागात मीच कसा राजा आहे आणि माझ्याशिवाय या कम्पनीला पर्याय नाही असे दाखवत राहणे असे फालतू गुण चिकटलेले असतात. त्यांना एक गोष्ट माहिती नसते. If you are not replaceable, you can not be promoted. आयुष्यभर तेच काम करत रहाल आणि तुमची प्रगती खुंटेल हे समजून घ्या.
सम्पर्क कौशल्य हा व्यवसायातील किंवा नोकरीतील अतिशय महत्वाचा भाग आहे.
3) सर्जनशील विचार क्षमता (Creative thinking ):
आपल्या समोर आलेले प्रश्न सोडवताना पूर्वग्रहदूषित न असता खुल्या मनाने त्याकडे बघायला हवे. प्रश्न सोडवण्यापूर्वी तो समजवून घ्यायला हवा, सर्व बाजूनी त्याचा विचार करायला हवा. कित्येक वेळा आपल्या बाजूने उत्तर मिळालेले असते पण दुसऱ्या व्यक्तीच्या किंवा समूहाच्या किंवा संस्थेच्या बाजूने सुद्धा विचार करायला शिकायला हवे. बरेच वेळा याच ठिकाणी व्यवस्थापन कमी पडते.
एक प्रश्न सोडवताना दहा नवीन प्रश्न उभे राहणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायला हवी. प्रश्न सोडवण्यासाठी एक नियोजित योजना असायला हवी जी सर्व संबंधितांना समजेल आणि त्यातील उद्धिष्ट सुद्धा साध्य होईल. प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्याचे म्हणणे एकुन घेणे, त्यावर विचार करून योग्य प्रश्नोत्तरे करून माहिती घेणे आणि मग तो कसा सोडवायचा या साठी प्रयत्न करणे महत्वाचे आज. काही वेळेला प्रश्न पूर्ण न ऐकताच किंवा न समजताच त्याचे समाधान करण्याची घाई काही आरंभशुराना असते त्या मुळे वेळ आणि प्रयत्न वाया जातात.
जटिल प्रश्नाला किंवा नवीनच उदभवलेल्या प्रश्नांना कधी कधी रुटीन उत्तरे न शोधता ज्याला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणतात ते करायला लागते.
इंग्रजीत ज्याला No stone unturned म्हणतात म्हणजे सर्व पर्याय शोधून त्यातील उत्तमातील उत्तम पर्याय देणे आपले उत्तरदायित्व पडते.
4) अवलंबित्व ( Dependibility): आपण काम करतो त्यावेळी आपली वागणूक अशी असावी की आपल्यावर काम सोपवल्यावर व्यवस्थापन बिनधास्त ( निर्धोक ) असेल. सर्वसाधारणपणे वेळीवेळी सारख्या नोकऱ्या बदलणाऱ्या माणसांवर व्यवस्थापन मोठ्या जबाबदाऱ्या देत नाहीत. प्रथम त्या व्यक्तीची या कम्पनिमध्ये टिकण्याची शाश्वती बघितली जाते आणि मगच मोठं मोठे प्रोजेक्ट त्या व्यक्तीवर सोपवले जातात. आमचे एक वरिष्ठ सांगायचे की ज्याने या कम्पनिमध्ये 5 वर्ष काढली आहेत त्याचेच मत विचारात घेतले जाईल कारण त्यांनी सुचवलेले मार्ग किंवा कार्यपद्धतीचे परिणाम तो बघू शकेल आणि त्यात सुधारणा करू शकेल. थोडक्यात rolling stone gathers no moss म्हणजे नोकरी सारखी बदलणाऱ्यांची किंमत व्यवस्थापनात फार मोठी नसते. एका विशिष्ट कामगिरीसाठी त्याची निवड होते आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली आणि कम्पनिकडे निष्ठा दाखवली तरच कम्पनी पुढील जबाबदारी देते.
5) कार्य नितीमत्ता ( work ethics): काम करताना प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता असणे फार महत्वाच आहेे. अनेक मंडळी आपल्या कामातील माहितीचा गैरवापर करून आर्थिक किंवा अन्य लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. आपण कितीही मोठे असा, जर आपल्या नैतिकतेबद्दल थोडी जरी शंका आली किवा तसा पुरावा मिळाला तर परिणाम सांगता येत नाही.
आय आय टी दिल्ली आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी चा पास विद्यार्थी आणि अमेरिकेत अति उच्च पदावर असलेला भारतीय व्यवसायिक, मेकेंसी आणि कम्पनी सारख्या विश्वविख्यात सल्लागार कम्पनीचा मॅनेजिंग डायरेक्टर, अमेरिकेतील गोल्डमन साचेस सारख्या महाकाय आर्थिक कम्पनीच्या बोर्डवर डायरेक्टर असलेल्या आणि इंडियन बिझिनेस स्कुल, हैद्राबाद या अतिशय नावाजलेल्या मॅनेजमेंट कॉलेजचा सह संस्थापक रजत कुमार गुप्ता यांनी गोल्डमन साचेस च्या बोर्ड मिटिंग मधील काही निर्णयांची माहिती आपल्या श्रीलंकन मित्र राज रत्नम याला पुरवून ( insider trading charges) अनैतिक रित्या पैसे मिळवल्याच्या कारणावरून त्याला अमेरीकेत 5 मिलियन डॉलर दंड आणि 2 वर्ष कारावास भोगावा लागला शिवाय अनेक बोर्ड वरील डायरेक्टर शिप सोडावी लागली. अनैतिक कार्य शैलीमुळे सम्पूर्ण आयुष्यात कमावलेली पत सुद्धा गेली आणि पुढील करियर सुद्धा खड्ड्यात गेली.
6) सकारात्मकता: प्रसंग कोणताही असो, त्यातून वाट काढण्याचे बळ आणि त्याला लागणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला कठीण प्रसंगातून तारून नेते. अनेक मंडळी कायम नकारात्मक विचार करतात. एखादी दिलेली जबाबदारी कशी टाळायची किवां ती पूर्ण कशी होणार नाही या साठी शंभर कारणे शोधून काढायची त्यांना सवय असते. व्यवस्थापन, परिणाम ( result) मागत असते, ते न साध्य होण्याची कारणे नव्हे. आपण सकारात्मक असाल तर आपले आणि आपल्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावू शकाल.
7) सांघिक कार्य ( Team work ). अनेक वेळा काही कामे ही एकट्याने करण्याची नसून त्यामध्ये अनेक लोकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभर लागलेले असतात. अशा वेळी आपण त्या टीम मध्ये कसे सामावले जातो, आपण टीमचाच एक भाग बनतो हे बघणे महत्वाचे असते. त्या टीम मधील सौहार्द पूर्ण वातावरण, सुसम्बधित सम्पर्क कौशल्य, एकंदर कामाची तसेच त्यातील आपल्या वाट्याच्या कामाची जाण, एकमेकांना मदत, या सारखे गुण असणे महत्त्वाचे ठरते. सर्व ठिकाणी मीच मोठा, माझ्यामुळेच अमुक झाले, तमुक झाले म्हणणे म्हणजे सांघिक भावनेला सुरुंग लावणे होय. प्रत्येक जण क्रेडिट घेण्यासाठी आसुसलेला असतो, मग एखादा धूर्त माणूस बघून बघून गुपचूपपणे त्या प्रोजेक्ट ची अशी वाट लावतो की परिस्थिती हाताबाहेर जाते. म्हणून सहकाऱ्यांना सांभाळणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. म्हणतात ना सायकल च्या चेनची एक जरी कडी तुटली तरी सायकल चालवणे मुश्किल होते. रामभक्त वानरसेनेने बांधलेल्या रामसेतू मध्ये मोठं मोठे दगड पाण्यामध्ये टाकणाऱ्या वानरांबरोबर त्या मधील फटी भरून तो सेतू बळकट करणाऱ्या खारुताई चा पण हातभार आहे हे विसरून चालणार नाही.
8) वेळेचे व्यवस्थापन: म्हणतात Time is money. आपण काम करत असताना जर शिस्तबद्ध पद्धतींने काम केले, विचारपूर्वक कामाचे नियोजन केले तर कामाचा वेळ वाचतो आणि अर्थात त्यामुळे पैसे सुद्धा वाचतात. आपले रेकॉर्ड व्यवस्थित ठेवून लागतील तेव्हा अतिशय कमी वेळात उपलब्ध करून दिले तसेच आपण सुटीवर असताना किंवा आपल्या गैर हजेरीत आपल्या कामाची अद्ययावत माहिती आपल्या सहकऱ्याला मिळावी आणि व्यवस्थसपनाचे अडु नये अशा रीतीने आपले काम असावे. अनेक वेळा नेमके याच ठिकाणी काही लोक आपल्या हाती काही गोष्टी एवढ्या घट्ट धरून ठेवतात की त्यांना व्यवस्थापन बढती देत नाही आणि तो माणूस रिटायर होईपर्यंत तीच खुर्ची सांभाळतो.
9) इतरांना कामात प्रेरणा देणे: कम्पनी ची प्रगती झाली तरच आपली प्रगती होणार आहे हे लक्षात घ्या. त्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहीजे. रथ ओढताना सर्व चाके सारखी पुढे गेली तरच रथ पुढे जाईल हे लक्षात घ्यायला हवे. आपली एकटयाची प्रगती होऊन उपयोग नाही तर आपल्या सहकाऱ्यांची सुद्धा प्रगती होणे आवश्यक आहे. नाहीतर राजकारण होऊन कामाचा वेग मंदावेल. तसेच त्यांच्या मनातील नकारात्मक विचार काढून टाकणे आवश्यक आहे नाहीतर कामात अडथळे तयार होतील.
10) प्रश्न सोडवणे: काम करत असताना नवनवीन प्रश्न समोर येतच असतात. त्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रश्न व्यवस्थित समजावून घेऊन, त्यातील मूळ कारण काय आहे? समोर असलेली माहिती काय आहे? आधी परिस्थिती काय होती त्यात नवीन काय वाढले किंवा नवीन काय कमी झाले याचा विचार व्हायला हवा. बाहेरील काही परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत का या सर्वाचा साकल्याने विचार करण्याची क्षमता असायला हवी. हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या सहकाऱ्यांची गरज लागू शकते तरी त्यांच्याबरोबर झालेला संवाद स्पष्ट, सत्य कथन करणारा, आणि त्याला संभाव्य किंवा अपेक्षित परिणाम काय असावा हे कळवले म्हणजे वेळेची बचत होईल आणि प्रश्न सुटेल.
बरेच वेळा एका प्रश्नावर किंवा प्रोजेक्ट वर अनेक लोक काम करत असतात. साहजिकच हे समूह एक संघ (homogeneous ) नसतात. ते वेगवेगळ्या पूर्व संस्कारांनी बंधीत असतात, त्यांचे मध्ये संभाव्य संघर्ष निर्माण होऊ शकतो अशा वेळी या मंडळींमध्ये कामाची सुसूत्रता येण्यासाठी प्रयत्न करणे जेणेकरून ह्या गोष्टींचा त्या कामावर परिणाम होणार नाही. या वेळी नेतृव गुणांची खूप आवश्यकता असून असे संघर्ष समूळ निपटून एकत्र काम कसे होईल हे बघायला हवे.
11) घरातील गोष्टी ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधील गोष्टी घरात घेऊन येणे, त्यावर चर्चा करणे, ऑफिस मध्ये राजकारण किंवा इतर कामाव्यतिरिक्त चर्चा करणे, दुसरा काम करत असताना, त्याच्या जवळ गप्पा मारायला जाणे हे सुद्धा दुर्गुणच समजले जातात.
ऑफिसमध्ये पेहेराव हा चार चौघांसारखा तसेच ऑफिस मध्ये शोभेल असा असावा. अमेरिकेत बिच वर बिकिनी घालणाऱ्या स्त्रिया सुद्धा ऑफिसमध्ये प्रॉपर ड्रेस घालतात आणि आमच्याकडे काही स्त्रिया ऑफिस मध्ये मॅक्सि घालून येताना मी बघितल्या आहेत. भारतात ऑफिसमध्ये पुरुषांनी शर्ट - पॅन्ट किंवा ऑफिस सूट आणि स्त्रियांनी साडी किंवा पंजाबी ड्रेस किंवा लांब स्कर्ट आणि टॉप हे ड्रेस योग्य मानले जातात. काही ठिकाणी आठवड्यातुन एक दिवस आपल्या आवडीचा ड्रेस घालायची परवानगी असते त्यावेळी भारतीय संस्कृती ला योग्य ते कपडे घालायला हरकत नाही.
12) आपल्याला एकायला थोडे विचित्रच वाटेल पण आय आय टी खरगपूर मधून मेटलर्जीकल इंजिनिअरिंग मध्ये बीटेक, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधून मटेरियल्स मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग मध्ये एम एस झालेल्या आणि पुढे युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वव्हनिया च्या व्हार्टन बिझिनेस स्कुल मधून एम बी ए झालेल्या सुंदर पीचाईला प्रथम गुगल चा सी ई ओ आणि नंतर गुगल ची होल्डिंग कम्पनी असलेल्या अल्फाबेट चा सी ई ओ बनवताना गुगल आणि अल्फाबेट चे पूर्व सी ई ओ आणि निर्माते लॅरी पेज आणि सेर्जी ब्रिन या द्वईनी सांगितले की सुंदर हुशार तर आहेच पण आम्ही त्याच्याकडून नेमकी काय अपेक्षा करत आहोत याची त्याला चांगली जाण आहे. त्याची प्रश्न सोडवण्याची हातोटी, लोकांशी आणि आपल्या टीम मेम्बर बरोबर करत असलेला व्यवहार त्यामधून होणारी कम्पनीची प्रगती बघता सुंदर ही कम्पनी आणखी पुढच्या स्तरावर नेईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्यामुळे नित्य व्यवहारातुन आम्ही बाहेर पडत आहोत. सुंदर दोन्ही कँपन्यांच्या बोर्ड वर डायरेक्टर सुद्धा आहे. तसे बघितले तर तो कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थी नसून जगातील सुप्रसिद्ध कम्प्युटर कम्पनीचा सी ई ओ होऊ शकतो त्यात त्याच्या सॉफ्ट स्किल चा फार महत्वाचा भाग आहे. तो गुगल मध्ये प्रोडक्ट प्रमुख रुजू झाला. ती फार मोठी पोस्ट नव्हती. गुगल चे क्रोम ब्राऊझर बनवताना फक्त 23 लोकांना हाताशी धरून अतिशय कमी वेळात आणि कमी खर्चात ते त्याने बाजारात आणून व्यवस्थापनाकडे आपल्याबद्दल विश्वास तयार केला. फक्त 49 वर्षीय सुंदर पिचाई चे 2020 चे वार्षिक compensation 281 मिलियन डॉलर होते. आणि त्याची नेट वर्थ 1.3 बिलियन डॉलर असून तो जगातील सर्वात जास्त पैसे कमवणारा एक्सिक्युटिव्ह आहे.
माधव भोळे
No comments:
Post a Comment