Monday, July 19, 2021

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 3.)

 व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 3.)


प्रथम आपण आर्टस् या विषयावर बोलूया. आर्टस् मध्ये करियर करणे हे सर्वांना हलक्या दर्जाचे वाटते. पण आर्टस् या विषयात विविध भाषा, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, राज्य शास्त्र, मानस शास्त्र ( psycology) या आणि अशा अनेक विषयात मूलत्वे अभ्यास केला जातो. तसे शेकडो पर्याय यात उपलब्ध आहेत पण त्याची कोणी पुरेशी माहिती करून घेत नाही. 

महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन, तसेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा मध्ये पास झालेली मंडळी वेगवेगळ्या स्तरांवर सरकारमध्ये नोकरी करत असतात. हे लक्षात घ्यायला हवे की सरकार सर्वात मोठा नोकरशहा आहे. केंद्राचे विविध खात्यातील 50 लाख नोकर, महाराष्ट्र सरकार मधील 19 लाख नोकर शिवाय विविध नगर पालिका या मधील नोकरवर्ग या सर्वांना या परिक्षात पास होणाऱ्या मंडळींची गरज असते.  अर्थात आरक्षण हा जरी एक मुद्धा असला तरी 49% जागा अजूनही खुल्या वर्गासाठी उपलब्ध आहेत. गावातील ग्रामसेवकापासून ते पंतप्रधानांच्या कॅबिनेट सेक्रेटरी पर्यन्त काम करणारे सरकारी नोकर यातील कोणती ना कोणतीतरी परीक्षा पास झालेले असतात. या परीक्षार्थी मध्ये आर्टस् विषयातील स्तानक सुद्धा असतात. विविध विद्यापीठातील संशोधन विभाग, शिक्षकी पेशा, भाषांतर कामे या सारख्या विषयात या शाखेचा उपयोग होत असतो. 

आर्टस् मध्ये शिकत असणारी बहुतेक मुले कॉलेजमध्ये टाईमपास म्हणून जातात असे माझे स्पष्ट मत आहे. परीक्षेच्या आधी काहीतरी थातुरमातुर तयारी करायची आणि मार्क मिळवायचे जेणेकरून आईवडिलांना दिलासा मिळावा एवढेच बऱ्याच मंडळींचे लक्ष असते. 

संस्कृत सारखी भाषा किंवा कोणत्याही भाषेत उच्चतम अभ्यास केलेला कोणताही माणूस कधीच उपाशी राहू शकत नाही. मागे आमचे ओळखीत प्राध्यापक डॉ पंकज चांदे विध्यार्थ्यांच्या समारंभाला आले होते. त्यांना कॉलेजमध्ये इंग्रजी शिकायचे होते, परंतु वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी संस्कृत मधून बी ए, एम ए, पी एचडी केले. सतत संस्कृत मधील विविध ग्रंथांची भाषांतरे, पुस्तक लेखन, कविता संग्रह इत्यादी विषयात काम करून त्यांनी आपले स्थान एव्हडे बळकट केले की भारत सरकारने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ जे भारतातील पहिले संस्कृत विद्यापीठ काढले त्याचे पहिले कुलगुरू होण्याचा मान त्यांना मिळाला. एवढेच काय त्यांच्या विदवत्तेच्या आदरामुळेच भारतातील सर्व विद्यापीठाच्या असोसिएशनचे ते एकेकाळी अध्यक्ष होते आणि जगातील 200 विद्यापीठांच्या असोसिएशनच्या कॉन्फरन्स चे अध्यक्ष बनण्याचा  मान त्यांना एकदा मिळाला होता. तात्पर्य एकच, ज्या विषयात अभ्यास कराल त्यात झोकून देऊन अभ्यास करा, यश आपलेच असणार. माझी सख्खी भाची राज्य शास्त्र ( political science) या विषयात तिने बी ए, एम ए, एम फिल आणि पुढे पी एच डी करून ती मुंबई विद्यापीठात गेले 25 वर्ष नोकरी करत असून आता पी एच डी विद्यार्थ्यांना गाईड ( मार्गदर्शक) म्हणून काम करत आहे. अर्थात या सर्वांबरोबर पगार, मान मरातब मिळतोच.

शिक्षकी पेशा मध्ये बी एड आणि एम एड करून पुढे नेट / सेट परीक्षा पास झाले तर आपली नोकरी नक्कीच कायम होते. आपण म्हणाल की नुसत्या एका डिग्रीने काम होत नाही काय? होते पण ते किती काळ टिकेल ते माहिती नाही पण या नेट सेट सारख्या गुणात्मक परीक्षा घेणाऱ्या परीक्षा पास झाल्यानंतर आपला कस त्यात लागतो. अर्थात यावर सुद्धा काहींचे दुमत आहे पण तो माझा विषय नाही.

लायब्ररी सायन्स, म्युसीओलॉजी ( म्युझियम ची व्यवस्था),  पुरातत्व शास्त्र ( archaeology),  इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिकस, गणित या सारखे विषय सुद्धा या शाखेत मोडतात. 

पुणे येथील 200 वर्ष जुने डेक्कन कॉलेज हे पुरातत्व शास्त्र, पाण्याखालील पुरातत्व शास्त्र, संस्कृत आणि इतर भाषा या सारखे विषय शिकवते. भारत सरकार सांस्कृतिक विभागाच्या अधिपत्याखालील आर्किओलॉजीकल सर्वे ऑफ इंडिया या खात्यात अशा विषयांच्या विद्यार्थ्यांना  नोकाऱ्या मिळतात. तसेच म्युसीओलॉजी या विषयात परदेशी नोकऱ्या सुद्धा उपलब्ध असतात. अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्यात पुरातत्व विभागाचे किती महत्वाचे योगदान होते ते आपणास माहीत आहेच. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक किंवा एतिहासिक वारसा असणारी सर्व वास्तू, मंदिरे, मूर्ती इत्यादीचे जतन आणि डागडुजी करण्याचे काम या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत असते. पंढरपूर आणि करवीरवासींनी श्री महालक्ष्मी यांच्या मूर्तीचे वज्र्यलेप आणि जतन करण्याचे काम याच खात्याकडे आहे.

इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला बँक आणि वित्तीय संस्था मध्ये विशेष मागणी असते. टाटा, बिर्ला सारखे मोठं मोठे उद्योगसमूह तसेच इन्व्हेस्टमेंट बँक, फायनॅन्सील मार्केट मध्ये काम करणाऱ्या ऍडव्हजरी संस्था, विविध रेटिंग संस्था या सर्व ठिकाणी एक इकॉनॉमिक्स विभाग असून त्यात चीफ इकॉनॉमिस्ट हा एक महत्वाचा हुद्धा असतो. या विषयाला देशाबाहेर सुद्धा फार किंमत आहे. रिझर्व्ह बँक मध्ये एक वेगळा इकॉनॉमिक्स विभाग आहे जो वित्त पुरवठा नियंत्रित करत असतो. देशाच्या आणि विविध आर्थिक संस्थांच्या कारभारात इकॉनॉमिक्सला फार महत्व आहे.

आय. ए. एस. सारख्या दुसऱ्या काही परीक्षा आहेत जसे की इंडियन इकॉनॉमिकल सर्व्हिसेस, इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस ज्या देशाच्या वित्त विभागाला पूरक काम करत असतात. या परीक्षा आय आय टी किंवा चार्टर्ड अकाउंटंट परिक्षेएवढ्याच कठीण असतात. दरवर्षी संसदेमध्ये बजेट मांडायचा आदल्या दिवशी इकॉनॉमिकल सर्वे मांडला जातो. हा सर्वे भारतीय इकॉनॉमिकल सर्व्हिसेस विभागातर्फे सादर केला जातो. बजेट तयार करण्यापूर्वी या आकडेवारीला किती महत्व असते हे फार थोड्याच लोकांना माहीत आहे.

मानसशास्त्र विभागातील मंडळी पुढे स्पेशल चाईल्ड एज्युकेशन, क्लिनिकल सायकॉलॉजी विषयात अभ्यास करतात आणि नोकरी किंवा व्यवसाय करतात. काही मंडळी मानव संसाधन ( human resources) मध्ये एम बी ए करतात   किंवा परसोनेल मॅनेजमेंट आणि लेबर लॉज या विषयात पुढील डिग्री घेत विविध अस्थापनात त्या त्या विभागात काम करतात. 

आर्टस् मधील काही मंडळी मास्टर ऑफ सोशल वेल्फेअर ( MSW) किंवा एम बी ए इन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी ( Master in CSR) डिग्री घेऊन विविध बिगर सरकारी संस्था ( NGO - Non government Organization) किंवा मोठं मोठ्या अस्थापनामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी विभागात काम करतात. CSR कम्पनी कायदा 2013 साली आला.

आपल्या देशात कोणताही ग्रॅज्युएट वकिलीचा अभ्यास करू शकतो. वकील किंवा कायद्याच्या अभ्यासकांचा उपयोग काय आहे हे मी आपणास सांगायला नको. आपल्या देशात आतापर्यंत 1248 केंद्रीय (active laws)  कायदे आहेत शिवाय राज्याचे कायदे वेगवेगळे आहेत. या सर्वांची अंमलबजावणी करणे तसेच आपल्या आशिलाचे काम त्या कायद्याच्या अंतर्गत बसवून देणे, त्यांच्यावरील अन्याय दूर करणे या साठी अगदी 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपर वर अफिडेव्हीट तयार करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय कोर्टात हरीश साळव्यांसारखे केसीस लढण्याचे काम हे वकील मंडळी करत असतात. त्यांचे मानधन ऐकून आपला होश उडून जाईल. कै राम जेठमलानी भारतातील सर्वात जास्त म्हणजे एका अपियरन्स ला रु 25 लाख घेत असत तर सर्वसाधारण मान्यवर वकील एका अपियरन्स ला 10,000 ते 15 लाख रुपये या प्रमाणे घेतात. आपली केस किती महत्वाची आहे आणि वकिलाची ख्याती किती मोठी आहे यावर हे सर्व अवलंबून असते. काही मंडळी प्रत्यक्ष वकिलाची सनद न घेता आपल्या नोकरीच्या ठिकाणी कायद्याचे ज्ञान वापरतात तर काही जण Bombay incorporated laws society (BILS) ही घेत असलेली सॉलिसिटर ची परीक्षा पास करून कायदेशीर सल्लागार म्हणून स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करतात.

अभ्यास कोणताही असो, तो करत असताना आपल्या विषयाशी निगडित अशी पुस्तके, शोध निबंध, विविध मॅगझीन आणि जर्नल वाचल्यानंतर आपल्याला विषयाचा गाभा कळतो, वाचून समजले तर गोडी सुद्धा  वाढते. फक्त परीक्षार्थी अभ्यास केला तर त्याची किंमत पण बाजार तेवढिच ठरवते जेव्हडी आपली विदवत्ता.

पुढील लेख सॉफ्ट स्किल्स आणि त्याचा नोकरी किंवा व्यवसायातील महत्व या वर असेल.

कदाचित सर्व लेख तुम्हाला उपयोगी असतील असेही नाही परंतु सर्व व्यापक लिखाण आवश्यक आहे असेे वाटते म्हणून हा खटाटोप.

माधव भोळे

No comments:

Post a Comment

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).

व्य वसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11). आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्यु...