व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन आणि गोंधळ ( लेख नंबर 2.)
काल एका मुलीच्या वडिलांचा फोन होता. म्हणाले आमच्या मुलींने बी एस सी मायक्रोबायोलॉजी केले आहे आणि आता तिला मार्केटिंग मध्ये एम बी ए करायचे आहे. हल्ली अनेक मंडळी ग्रॅज्युएशन नंतर एमबीए किंवा दुसरे काही प्रोफेशनल कोर्सेस करायला बघतात. त्यांना असे वाटते की एम बी ए झाले म्हणजे भरपूर पगार मिळेल. कित्येकांना तर असे वाटते की जास्त महाग कोर्स केला म्हणजे जास्त पगाराची नोकरी मिळणार. कित्येक शैक्षणिक संस्थांनी जोरदार मार्केटिंग करून आपले महत्व आणि त्याबरोबर आपल्या फि वाढवून ठेवल्या आहेत.
कित्येक वेळा कॉम्प्युटर सायन्स सारख्या कठीण विषयात इंजिनिअरिंग करून पुढे एम बी ए फायनान्स मध्ये करणारी आणि पुढे इन्व्हेस्टमेंट बँकिंग मध्ये करियर करणारी मुले मी बघितली आहेत.
आता मायक्रोबायोलॉजी आणि एम बी ए इन मार्केटिंग किंवा कम्प्युटर सायन्स आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग चा काही सम्बन्ध आहे काय? पण कम्पन्या सुद्धा अशा मंडळींना प्राधान्य देतात हे विशेष! कारण त्यांना उच्च शिक्षित मॅनेजर हवे असतात, इनोव्हेटर नकोत. त्यांना पसारा सांभाळणारे सुपर क्लार्क हवे आहेत. सर्वाना ए सी ऑफिस मध्ये नोकरी हवी आहे, फिल्ड वर्क कोणाला नको आहे. मग मालक पण खुश आणि नोकर सुद्धा खुश. पण ग्राउंड लेव्हलला जे ज्ञान मिळते ते एसी ऑफिस मध्ये बसून मिळत नाही. त्याचा उपयोग स्वतःसाठी किव्वा आपल्या कम्पनीसाठी कसा करायचा हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे.
ज्या विषयाशी आपण निगडित आहोत त्याच विषयाशी संबंधीत एम बी ए किंवा पुढील शिक्षण आपण घेतले तर त्याचा जास्त फायदा आपल्याला आणी आपण ज्या संस्थेत काम करतो त्याला होतो. कारण त्याला मुळापासून त्या विषयाचे ज्ञान असते. एम बी ए जरूर करावे पण आपला पाया सोडू नये असे वाटते. अर्थात डॉ श्रीराम लागू, डॉ जब्बार पटेल, डॉ काशीनाथ घाणेकर, श्रीधर फडके सारखे थोडेच जे आपला मूळ पेशा सोडून दुसऱ्या क्षेत्रात सुद्धा चमकदार कामगिरी करून दाखवतात.
खरे म्हटले तर बी एस सी मायक्रोबायोलॉजी वाल्यानी एमबीए इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, एम बी ए इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, एम बी ए इन क्लिनिकल रिसर्च किंवा तत्सम कोर्स करावा ज्याचा फार्मा किंवा हेल्थकेयर क्षेत्रात उपयोग होईल, जेणेकरून आधी शिकलेले ज्ञान सुद्धा फुकट जाणार नाही. तसेच कॉम्प्युटर सायन्स मंडळीं साठी आर्टिफिशियल इंटिलीजन्स पासून अगदी ब्लॉक चेन सारखे विविध नवनवीन विषय किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट वगैरे विषयात अभ्यास केला तर तो जास्त सयुक्तिक असेल. कम्प्युटर सायन्स या विषयाला जेव्हडा जागतिक स्कोप आहे तेव्हढा अन्य कुठल्याही विषयाला सध्या नाही असे मला वाटते.
एकदा विको वज्र्यदंती वाले गजाननराव पेंढारकर सांगत होते, त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनामुळे बी फार्म केले आणि वडिलांची वज्र्यदंती टूथ पावडर विकायला सुरवात केली. दिवसभरात 50 रुपयांची सुद्धा विक्री होत नव्हती, त्याचवेळी त्यांचे वर्ग मित्र महिना रु 5000 ची नोकरी करत होते. पेंढारकरानी हे वडिलांजवळ बोलून सुद्धा दाखवले, त्या वेळी वडिलांनी सांगितले, जे आज रु. 5000 महिना घेतात ते उध्या रु. 50,000 घेतील पण तुझी प्रगती त्यापेक्षा जास्त होईल कारण तुला औषध बनवणे आणि विकणे, दोन्ही चा अनुभव मिळणार आहे. आणि त्याप्रमाणे पेंढारकरांची प्रगती होत गेली कारण ग्राउंड लेव्हल चे ज्ञान जास्त महत्वाचे.
असेच एक उदाहरण म्हणजे दिलीप संघवी यांचे आहे. दिलीप संघवी हे सन फर्मास्युटिकल चे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांचे वडील कलकत्ता येथे औषधांचे होलसेल डिस्ट्रिब्युटर होते. दिलीप 21 व्या वर्षी बीकॉम झाल्यानंतर वडिलांच्या औषध व्यवसायात त्यांनी काम करायला सुरुवात केली. स्कुटरवर डबल सीट बसून ते वेगवेगळ्या केमिस्ट कडे औषधें विक्रीसाठी जात असत. जरी ते बीकॉम असले तरी प्रत्यक्ष विक्रीचे आणि वितरणाचे काम केल्यामुळे त्यांना मार्केटचे ज्ञान आले आणि अल्पावधीतच म्हणजे वयाच्या 28 व्या वर्षी 1983 ला स्वतःची सन फर्मास्युटिकल नावाची कम्पनी वापी, गुजरात येथे काढली. काँट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरर न बनता हळूहळू औषधांचा स्वतः अभ्यास करून वेगवेगळ्या विषयात संशोधन करण्याचे दृष्टीने पाऊल उचलून तज्ञ मंडळींच्या साहाय्याने एक संशोधन करणारी कम्पनी म्हणून ती उदयास आणली. आज या कम्पनीचा टर्न ओव्हर रु 12,000 कोटी आहे. अणि ते भारतातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. असे शेकडो एमबीए त्यांच्याकडे काम करतात. कारण एकच, खूप मेहेनत आणि मुळापासून अभ्यास करण्याची वृत्ती.
ए एम नाईक सारख्या फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी घेतलेल्या व्यक्तीने लार्सन टुबरो सारख्या एका मध्यम आकाराच्या निव्वळ इंजिनिअरिंग कम्पनीचे 75,000 कोटी टर्न ओव्हर असलेल्या एका महाकाय कम्पनिमध्ये रूपांतर केले ते अनुभवातून मिळालेल्या ज्ञानातून. डिग्री महत्वाची आहे पण ज्ञान जास्त महत्वाचे असे मला वाटते. ए एम नाईक जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांना एकंदरीत रु 78.91 करोड रिटायरमेंट आणि इतर बेनिफिट मिळाले. त्यांची शेवटची सॅलरी रु. 3.36 करोड होती.
लागल्यापासून एकाच कम्पनिमध्ये राहून आपल्या उपजत तसेच स्वीकृत गुणांना वाव निर्माण करणे हे एक फार मोठे तप आहे. नाईक त्यात यशस्वी झाले. धीरुभाई अंबानी जेव्हा लार्सन टुबरो विकत घ्यायला निघाले त्यावेळी नाईकांनी इंदिरा गांधींकडे जाऊन लार्सन टुबरो देशासाठी किती महत्वाची आहे हे पटवून दिले आणि धीरूभाईंपासून लार्सन टुबरो ला वाचवले. हे त्यांच्या कामाची निष्ठा दाखवते. धीरूभाई फॉर्म मध्ये असताना त्यांच्या विरोधात इंदिरा गांधींना पटवणे हे अत्यन्त मुश्किल काम पण त्यांनी ते केले. नाईकांमधील नेतृत्वगुणामुळे हे शक्य झाले.
तात्पर्य एकच, कोणत्याही विषयात अभ्यास करा पण त्यामध्ये मुळापासून ज्ञान घ्या. इतर गुण आणि सॉफ्ट स्किल्स तसेच नेतृत्व गुण अवगत करा. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करा. तुमचा उदय कोणीही रोखू शकत नाही. शिक्षणामध्ये सखोल अभ्यास, मेहेनत, संशोधक वृत्ती, बुद्धिमत्ता, प्रेझेन्टेशन स्किल्स, प्रामाणिकपणा आजूबाजूचे ज्ञान आणि सध्य जागतिक स्थिती माहिती असणे याला पर्याय नाही.
आता या पुढील लेख प्रत्येक विषयात असलेले अनेक कोर्सेस, त्याचे व्यावहारिक उपयोग आणि त्यातील खाच खळगे या वर असतील.
माधव भोळे
No comments:
Post a Comment