Monday, July 19, 2021

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन आणि गोंधळ ( लेख नंबर 1.)

 व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन आणि गोंधळ ( लेख नंबर 1.)


हल्ली अनेक मुले शिक्षण घेताना आपल्या करियर क्षेत्र  बदलताना दिसतात.  १० वी झाल्यानंतर या बाबतीत घराघरात खरे वेध लागायला सुरवात होते. त्यानंतर शाळेतील किंवा कोणते तरी करियर मार्गदर्शन व्याख्यान ऐकल्यानंतर एक क्षेत्र  निवडले  जाते.  प्रत्येक आई वडिलांना आपला पाल्य निदान ग्रॅज्युएट व्हावा असे वाटत असते. काही मंडळींनी किंवा त्यांच्या पालकांनी आधीच ठरवले असते की  त्यांना काय व्हायचंय ते. काही मंडळी मार्क आल्यावर बघू असे म्हणतात. तीच गोष्ट पुढे 12 वीला होते आणि पुढे ग्रॅज्युएट झाल्यानंतर होते. अनेक आई वडिलांना त्यांच्या शिक्षण काळात डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याची इच्छा असते आणि त्यांचे न पूर्ण झालेले स्वप्न पाल्याने पूर्ण करावे अशी त्यांची अपेक्षा असते. 

या सर्वांसाठी ही मंडळी महागडे क्लासेस लावतात. १० वीला 80 ते 90%  मार्क मिळाल्यावर ही मंडळी 12 वीला सायन्सला जातात. यातील अनेकांचे मार्क 12 वीला 55 ते 70% वर येतात. तरीसुद्धा हे डॉक्टर किव्वा इंजिनिअरिंगला जातात. येथपर्यंत ठीक आहे. ज्यांना डॉक्टर किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायला जमत नाही ते मग बीएस्सी, किंवा बीफार्म कोर्सेस घेऊन ग्रॅज्युएट होतात.

ज्या मंडळींना सायन्सची आवड नसते किंवा ज्यांना गणोबा (गणित) ची अडचण वाटते ती मग कॉमर्सला जातात आणि काही मंडळी आर्टसला जातात. आर्टस् कॉलेज मधील विविध भाषा इतिहास, भूगोल घेऊन मग शिक्षकी पेशाकडे वळतात.

आवड, पॅशन म्हणून काही जणांना असते अशी मंडळी फाईन आर्टस्, कमर्शियल आर्टस्, आर्किटेक्टचर, फॅशन डीझाईन, इंटिरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझाइन, ज्वेलरी डिझाइन, ब्युटीशीयन, ट्रॅव्हल टुरिसम असे विषय निवडून आपले करियर करतात. 

शिक्षण घेणे चांगली गोष्ट आहे. पण त्याचा व्यवहारात कसा उपयोग होतो हे बघणे महत्वाचे आहे.  खरे म्हटले तर या शिवाय सुद्धा अशी अनेक व्यवसाय क्षेत्र आहेत की ज्याचा विचार केला जात नाही. जसे की सी कॅडेट ( मर्चंट नेव्ही), परिचारिका ट्रेनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिसम तसेच सर्व प्रकारचे स्किल ( पंतप्रधान कौशल्य विकास योजने मार्फत 34 प्रकारच्या व्यवसाय क्षेत्रात 165 प्रकारची आवश्यक  कौशल्याना अतिशय माफक दरात काही वेळा मोफत शिकवले जाते). 

या सर्वांचा खरा कस लागतो तो नोकरी मिळवताना.
एकतर अवांतर माहितीमध्ये आपली मंडळी कमी पडतात. जगात काय सुरू आहे हे ते पेपर किंवा इंटरनेट वर न वाचता आपला मित्र किंवा मैत्रिणींच्या घोळक्यात काय चर्चा होते या माहितीवर आपले भवितव्य ठरवतात.  

ती हॉटेल मॅनेजमेंट ला गेली म्हणून मि पण जाणार अशी भूमिका तयार होते. अनेक वेळा तिला जेवण करायची आवड आहे म्हणून आम्ही तिला हॉटेल मॅनेजमेंट ला घातले असे शब्द मी ऐकले आहेत. अहो पण हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे नुसते जेवण करणे नसून किचन पासून ते हाऊस किपिंग, रूम मॅनेजमेंट, कॉफी शॉप ते बार मधील विक्री, अगदी रिसेप्शन सुद्धा त्या कोर्स मध्ये शिकवले जाते. शाकाहारी मंडळीना मांसाहारी पदार्थ करायला सुद्धा शिकवले जाते. तिन्ही शिफ्ट मध्ये काम करायला लागते. हाऊस किपिंग मध्ये सर्व खोल्या आणि लॉबी, संडास बाथरूम सुद्धा स्वच्छ करायला लागते. आपण किंवा आपला पाल्य हे सर्व करणार आहे का? लग्न करताना आपली मुलगी शिफ्ट मध्ये काम करणार यावर आपल्यावर काही सामाजिक बंधने आहेत का? दररोज नवनवीन देशी विदेशी ग्राहकांशी सम्पर्क येणार तरी आपला पाल्य तेव्हडा धीट आहे का? ती तेवढि धीट झालेली आपल्याला चालेल का? घरचे संस्कार आणि नोकरीचे वातावरण या मध्ये फारच तफावत असेल तर त्यामुळे घरचे वातावरण बिघडू शकते. या सर्व गोष्टींचा विचार शिक्षण घेताना आधीच करायला हवा. माझ्याकडे एक मुलगी सेक्रेटरी च्या पोस्ट साठी आली होती. तिचे 3 वर्षाचे हॉटेल मॅनेजमेंट झाले होते. मी तिला विचारले की तू हॉटेल मॅनेजमेंट मध्येच का नोकरी बघत नाहीस? ती म्हणाली त्या मध्ये शिफ्ट असतात आणि माझ्या पप्पाना ते मान्य नाही. मला वाईट वाटले कारण तिने 3 वर्षाचा वेळ आणि पैसे दोन्ही पाण्यात घालवले होते. 

असो या पुढील चर्चा पुढील लेखामध्ये. 

आपणाला हा लेख कसा वाटला. मी पुढे लिहू का? जरूर कळवा.

माधव भोळे

No comments:

Post a Comment

व्यवसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11).

व्य वसाय / शिक्षण मार्गदर्शन ( लेख नंबर 11). आज आपण एका वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत. कोणी त्याला मास मीडिया म्हणतात तर कोणी त्याला मास कम्यु...